नाशिक। दि. २९ ऑगस्ट २०२५: भरधाव बुलेटने दिलेल्या धडकेत ४८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. दिंडोरीरोडवरील अवधुतवाडी भागात हा अपघात झाला. अपघातानंतर बुलेटस्वार आपले वाहन सोडून पसार झाला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिराबाई दत्तू पवार ( वय: ४८, रा. पाटील दवाखाना जवळ म्हाडा बिल्डींग, सम्राटनगर दिडोरीरोड) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत अनिल पवार यांनी फिर्याद दिली आहे. हिराबाई पवार या गुरूवारी (दि.२८) दुपारी १ वाजेच्या सुमारास तारवाला सिग्नलकडून दिंडोरीनाक्याच्या दिशेने पायी जात असतांना हा अपघात झाला.
अवधुतवाडी येथील सप्तशृंगी देवी मंदिरासमोर त्या रस्ता ओलांडत असतांना भरधाव एमएच १५ जीएच १३२३ या बुलेटने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात हिराबाई पवार यांचा मृत्यू झाला असून दुचाकीस्वाराने आपले वाहन सोडून पोबारा केला आहे. अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत. (पंचवटी पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ४०९/२०२५)