नाशिक। दि. २९ ऑगस्ट २०२५: आदि कर्मयोगी अभियानाची सुरवात राज्यात 10 जुलै 2025 पासून झाली आहे. या अभियानाचा प्रमुख उद्देश आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणणे हा आहे. सर्व शासकीय यंत्रणांनी नाशिक जिल्ह्यात हे अभियान सक्रिय सहभागातून व समन्वयातून यशस्वीपणे राबवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित आदि कर्मयोगी अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळेत जिल्हाधिकारी श्री. शर्मा बोलत होते. यावेळी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लिना बन्सोड, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (इगतपुरी/ त्र्यंबकेश्वर) पवन दत्ता, उपविभागीय अधिकारी (नाशिक) अर्पिता ठुबे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अर्जुन गुंडे, उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, तहसीलदार (समान्य प्रशासन) मंजुषा घाटगे, सह संचालक (नियोजन) आदिवासी आयुक्तालय नाशिक किरण जोशी, जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले की, आदि कर्मयोगी अभियान हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत 2047 शी संबंधित आहे. या अभियानात मुख्यता सेवा, संकल्प आणि समर्पण ही भावना विकसित केली जाणार आहे. यात विविध शासकीय विभागांना एकत्रित एकमेकांशी सहकार्य, संकल्प आणि सेवा या हेतूने जोडण्याचे महत्त्वाचे काम होणार आहे. या अभियातनातून आदिवासी समुदायांचा सर्वांगीण विकास केला जाणार असून शिक्षण, आरोग्य, पोषण, पायाभूत सुविधा आणि सांस्कृतिक जतन यावर अधिक लक्ष दिले जाणार आहे. अभिनयातून आदिवासी क्षेत्रातील योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावयाची असल्याने सर्व शासकीय कार्यालयांनी या अभियानात भरीव योगदान द्यावे असे जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी यावेळी सांगितले.
आदिवासी आयुक्त लिना बन्सोड यांनी आदि कर्मयोगी अभियानाचे स्वरूप, कार्यपद्धती व शासकीय यंत्रणांचा सहभागाचे महत्व यावेळी विषद केले. यावेळी सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वत:तील क्षमता ओळखण्यासाठी व्यापक वैचारीक दृष्टकोन विकसित करण्याच्या दृष्टीने काही प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला. अभियान यशस्वीतेसाठी सामूहिक शपथ घेण्यात आली.