नाशिक। दि. २८ ऑगस्ट २०२५: वर्षभर एका खोलीत डांबून ठेवत तरुणीवर तिच्या इच्छेविरोधात बळजबरीने अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलिस ठाण्यात २३ वर्षीय तरुणाविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी नाशिकमध्ये आल्यानंतर संशयित समीर (२३, रा. सिडको) याने तिला सिंहस्थनगर येथे ऑक्टोबर २०२४ मध्ये खोली घेऊन दिली. मात्र, या खोलीतून वर्षभरापासून त्याने तिला बाहेरच पडू दिले नाही. या दरम्यानच्या काळात त्याला वाटेल तेव्हा तो खोलीत यायचा आणि पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार करत असे.
एके दिवशी हा तरुण बाहेरगावी गेल्यानंतर तरुणीने घराबाहेर पडत अंबड पोलिस ठाणे गाठत घडलेला प्रसंग कथन केला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक बागूल करत आहेत. (अंबड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ५७४/२०२५)