नाशिक | दि. २८ ऑगस्ट २०२५ : नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस सुरू आहे. परिणामी गंगापूर धरण सध्या तब्बल ९८.५० टक्के क्षमतेने भरले असून पाटबंधारे विभागाने सलग चौथ्या दिवशी ३०२५ क्युसेक विसर्ग सुरू ठेवला आहे. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला असून गंगाघाट परिसरातील व्यापारी, टपरीधारक तसेच नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याने जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला असून उद्यापर्यंत (दि. २९) मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या आठ दिवसांपासून शहर व जिल्ह्यात दररोज पावसाची हजेरी लागलेली आहे.
पावसाचा जोर कायम:
त्र्यंबक तालुक्यासह पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असून बुधवारी (दि. २७) दिवसभर रिमझिम ते मध्यम सरी कोसळल्या. शहरात पंचवटी, म्हसरुळ, मेरी, मखमलाबाद या भागांमध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी पावसाचा जोर अधिक होता. नाशिक शहरात बुधवारी एकूण ८ मिमी पावसाची नोंद झाली.
गंगापूर धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे बुधवारीही दिवसभर नदीपात्रात ४,८८१ क्युसेक पाणी वाहत होते. दरम्यान, कश्यपी व गौतमी धरणांतून होणारा विसर्ग गंगापूरमध्ये सुरू असल्याने गोदावरीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी करण्यात आलेले नाही. आतापर्यंत गंगापूर धरणातून ६ हजार ९८१ दलघफू पाणी सोडण्यात आले आहे.
पाणलोट क्षेत्रातील पावसाची नोंद:
बुधवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एकूण १८१ मिमी पाऊस झाला. त्यात त्र्यंबकेश्वरमध्ये ३६ मिमी, गंगापूरमध्ये १९ मिमी, आंबोलीत ७० मिमी, गौतमी गोदावरीत ३१ मिमी तर काश्यपी भागात २५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.