नाशिक। दि. २२ ऑगस्ट २०२५: शहरात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या एका अनैतिक व्यवसायाच्या अड्ड्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पीसीबी-एमओबी पथकाने गुरुवारी (दि. २१) मेट्रोझोनसमोरील ‘आरंभ स्पा’ सेंटरवर छापा टाकून ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी कानपूर, दिल्ली, बिहार, मिझोरम आणि नाशिकमधील एक अशा एकूण पाच महिलांची सुटका केली आहे.
उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहायक आयुक्त संदीप मिटके यांना या अनैतिक व्यवसायाची माहिती मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या पथकाने एक बनावट ग्राहक पाठवून माहितीची खातरजमा केली. या ठिकाणी परराज्यातील तरुणींकडून अनैतिक व्यवसाय करून घेतला जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तत्काळ पथकाने छापा टाकून पाच पीडित महिलांना ताब्यात घेतले.
या स्पा सेंटरची संचालिका खुशबू परेश सुराणा या महिलेलाही ताब्यात घेण्यात आले आहे. तिच्याविरोधात यापूर्वी ‘पिटा’ आणि ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे.