
नाशिक। दि. २१ ऑगस्ट २०२५: नाशिकच्या भांडी बाजारातील एका दुकानातून तीन अज्ञात महिलांनी मूर्ती चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट १ ने तातडीने तपास करून तीनही महिलांना अटक केली आहे.
गिरीष दिनकर शेटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या भांडी बाजार, नाशिक येथील दुकानातुन तीन अनोळखी महिलांनी एक गणपतीची व चार हत्तीच्या मुर्ती चोरून नेल्याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
नाशिक शहरामध्ये काही महिला हया दुकानात घुसून तेथील गर्दीचा फायदा घेवुन दुकानदार याची नजर चुकवून चोरी करत असल्याच्या घटना घडत होत्या. याप्रकरणी तपास करत असतांना पोलीस हवालदार संदिप भांड यांना त्यांच्या गुप्त बातमीदार यांच्या मार्फतीने बातमी मिळाली की, या गुन्हयातील चोरीच्या मुर्ती घेवुन तीन महिला हया बाहेरगावी जाण्यासाठी मेळा बसस्टॅन्ड नाशिक येथे येणार आहेत.
सदरची माहिती गुन्हे शाखा (युनिट १) चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देण्यात आली. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट ०१ चे पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, हवालदार संदिप भांड, प्रशांत मरकड, प्रदिप म्हसदे, मिलींदसिंग परदेशी, नाझीमखान पठाण, विशाल देवरे, जगेश्वर बोरसे, मुक्तार शेख, मनिषा सरोदे, अनुजा येलवे, समाधान पवार अशांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने मेळा बसस्टॅण्ड येथे जाऊन सापळा रचुन तीन महिलांना सदर पथकाने ताब्यात घेतले. यात १) सुमनबाई सावळीराम जाधव (वय-५५ वर्षे, रा-मुकुंदवाडी, संजयनगर, छत्रपती संभाजीनगर), २) फुलाबाई शिवाजी गायकवाड (वय-३५वर्षे, रा- मुंकूदवाडी, संजयनगर, छत्रपती संभाजीनगर) ३) कमलबाई राधाकिसन जाधव (वय-४५ वर्षे, रा- मुकुंदवाडी, संजयनगर, छत्रपती संभाजीनगर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
तीनही महिलांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातुन चोरीस गेलेली एक गणपतीची मूर्ती व चार पितळी धातुच्या हत्तीच्या मुर्ती असा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला असुन गुन्हयाचा पुढील तपास सरकारवाडा पोलीस ठाणे करीत आहेत.