नाशिक: विविध विकास कामांच्या माध्यमातून नाशिकच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचे प्रयत्न- मंत्री गिरीश महाजन

नाशिक, दि. १५ ऑगस्ट २०२५: नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटन, रोजगार निर्मिती, सेवा क्षेत्राला चालना देण्याचे प्रयत्न विविध विकास कामाच्या माध्यमातून होत आहेत. या कामांना येत्या काळात अधिक गती देण्यात येईल, असे प्रतिपादन जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे देशाच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्री महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी आमदार सीमा हिरे, आमदार नितीन पवार, विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, मनपा उपायुक्त करिश्मा नायर आदींची उपस्थिती होती.

मंत्री महाजन म्हणाले की, राज्य शासनाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. शंभर दिवसांच्या उपक्रमात विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हा परिषद कार्यालयाने सेवाविषयक बाबींच्या अनुषंगाने प्रभावी अंमलबजावणी केली. उत्कृष्ट ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांसाठी तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर प्रोत्साहन देण्यासाठी या वर्षापासून ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: रस्त्यात अडवून जबरी लूट करणाऱ्या दोघांना अटक !

सध्या जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. याशिवाय, पाण्याचे महत्व लक्षात घेता, नारपार-गिरणा नदी जोड प्रकल्पासाठी जलसंपदा विभागाने 7 हजार 645 कोटी मंजूर केले आहेत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, उत्तर नाशिक आणि लगतच्या जळगाव आणि धुळे जिल्ह्यांमध्ये अधिक जमीन लागवडीखाली येणार आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा यासाठी मुदत ३० ऑगस्ट पर्यंत वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यातील 4 लाख 43 हजार शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता वितरणासाठी 88.66 कोटी रुपये वितरीत झाले आहेत. याबरोबरच खरीप आणि रब्बी हंगामासाठी पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट साध्य करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सहकारी व राष्ट्रीयकृत बँकांना दिले असल्याचे मंत्री महाजन यांनी यावेळी सांगितले.

आगामी रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना बि-बियाणे, रासायनिक खते वेळेत उपलब्ध होतील याचे नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. ॲग्रीस्टॅक म्हणजेच फार्मर आयडीसाठी प्रत्येक शेतकऱ्याने नोंदणी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करून त्या माध्यमातून विविध विकास कामांना चालना देण्यात आलेली आहे. यासर्व कामांसाठी राज्य शासनातर्फे कोणत्याही प्रकारे निधी कमी पडणार नाही. कुंभमेळ्याच्या आधी सर्व कामे गुणवत्तापूर्वक पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही मंत्री महाजन यांनी सांगितले. आगामी कुंभमेळ्यातील भाविकांची गर्दी लक्षात घेता नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे नवीन घाट प्रस्तावित केले आहेत. सर्व साधु-संत-महंत व विविध आखाड्यांचे प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध कामे केली जात आहे. पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, पायाभूत सोयीसुविधा, दळणवळणाची साधने आदींचे नियोजन केले जात आहे. कुंभमेळा हरित, स्वच्छ, पर्यावरणपूरक होण्यासाठी राज्य शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना लोकसहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक महापालिकेची अतिक्रमणाविरुद्ध मोहीम आजपासून पुन्हा सुरू...

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरकरीता मंजूर विकास आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील साल्हेर किल्ल्याचा समावेश जागतिक वारसा मध्ये झाला आहे. यापूर्वीच राज्य शासनाने या किल्ल्याचे जतन व संवर्धनासाठी आवश्यक निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. जिल्ह्यातील पर्यटन आणि रोजगार वाढीस यामुळे चालना मिळणार असल्याचा विश्वास मंत्री महाजन यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यात विविध अभियानाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, शिक्षण आदी क्षेत्रात विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. याशिवाय, विशेष साहाय्य योजनेच्या माध्यमातून वृद्धापकाळ, दिव्यांग योजना, निराधार योजना श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत असल्याची माहितीही मंत्री महाजन यांनी यावेळी दिली.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून विविध आवास योजनांचा लाभ जिल्ह्यातील लाभार्थ्यांना दिला जात आहे. तसेच, शिक्षणाबरोबरच नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे म्हणून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय, सामान्य रुग्णालय कार्यरत आहेत. याशिवाय गरजू रुग्णांना औषधोपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित केला असल्याची माहिती त्यांनी दिली.

⚡ हे ही वाचा:  नाशिककरांनो लक्ष द्या ! शहरातील 'या' वाहतूक मार्गांत अतिशय महत्वाचे बदल !

समृद्धी महामार्गाचा नाशिक-इगतपुरीचा अंतिम 76 किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला असून, ग्रामीण भागातील पोर्ट कनेक्टिव्हीटी सुधारली आहे. तसेच, द्वारका चौकात कलंबोलीसारखा 8 फ्लाय ओव्हर मॉडेल विकसित केले जाणार असून, नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गाचे 6 लेनमध्ये रूपांतर ही होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी, वीर पत्नींना शासकीय जागेचे शेती प्रयोजनासाठी जमिनीचे वाटप, राष्ट्रपती पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार, महसूल विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांचा सत्कार, जिल्हा परिषदेच्या सुपर 50 उपक्रमात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार, सुंदर गाव योजने अंतर्गत पुरस्कारप्राप्त गावांचा सत्कार, अवयवदान केलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांचा सन्मान, 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम अंतर्गत प्रथम क्रमांक प्राप्त झालेल्या विभाग व जिल्हास्तरीय कार्यालय प्रमुखांना प्रशस्तिपत्रक प्रदान, शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार, आवास योजनेत जिल्हास्तरावर चांगले काम करणाऱ्यांचा सत्कार आणि नाशिक हरित कुंभ स्पर्धेत पारितोषिक विजेत्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

या स्वातंत्र्यदिन सोहळ्यास स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, खेळाडू, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here