मुंबई। दि. १४ ऑगस्ट २०२५: राज्य शासनाने वाहनांबाबत काही महिन्यांपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या गाड्यांना HSRP नंबर प्लेट बसवणं अनिवार्य करण्यात आलं आहे.
यासाठी अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2025 ही देण्यात आली होती. मात्र आता यामध्ये वाढ करण्यात आली असून 30 नोव्हेंबर 2025 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. सरकारकडून मुदतवाढ देण्यात आल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्या वाहनमालकांनी यापूर्वी HSRP साठी नोंदणी केली नाही, त्यांनी परिवहन विभागाच्या वेबसाईटवर जाऊन अपॉइंटमेंट घ्यावी. 1 डिसेंबर 2025 नंतर HSRP नसलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
ज्या गाड्या 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत आहेत, त्यांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) प्लेट लावण्याची आवश्यकता आहे. पूर्वी याची अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2025 होती. पण वाहन मालकांकडून प्रतिसाद कमी मिळाल्यामुळे राज्य सरकारने अखेर आता मुदत वाढवली आहे. 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत HSRP प्लेट लावण्याची अंतिम मुदत सरकारकडून देण्यात आली आहे.
HSRP प्लेट लावण्यासाठी वाहन मालकांनी परिवहन विभागाच्या वेबसाईटवर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी 30 नोव्हेंबर 2025 पर्यंतची मुदत आहे. त्यानंतर, 1 डिसेंबर 2025 पासून वायुवेग पथकाद्वारे नियमांनुसार कारवाई केली जाईल, असं शासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
दरम्यान, “जुन्या परिपत्रकानुसार HSRP न बसवलेल्या वाहन मालकांचे वाहन हस्तांतरण, पत्ता बदल करणे, कर्जबोजा चढविणे, कर्जबोजा उतरविणे इत्यादी कामांवर निर्बंध लावण्यात आले होते. यापुढे HSRP न बसविलेल्या वाहन मालकांच्या वाहनांची पुनर्नोदणी, वाहनात बदल करणे, परवाना नूतनीकरण इत्यादी सर्व कामे (योग्यंता प्रमाणपत्र नूतनीकरण वगळून) थांबवण्यात यावीत. तसेच वायुवेग पथकामार्फत वाहन तपासणीमध्ये जप्त केलेल्या वाहनांना HSRP लावल्याशिवाय सोडण्यात येऊ नये,” असं शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे.