नाशिक। दि. ११ ऑगस्ट २०२५: तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविकांकरिता एस. टी. महामंडळाकडून मेळा, नवीन ठक्कर बसस्थानकामधून जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. रविवारी (दि. १०) दुपारपासून भाविकांचा ओघ सुरू झाला आहे.
यामुळे शहर वाहतूक शाखेकडून सोमवारी (दि. ११) रात्री ८ वाजेपर्यंत ठक्कर बसस्थानक, तालुका पोलिस ठाणे, मेळा बसस्थानक, किशोर सुधारालय रस्त्यावर एसटी बसेस, सिटी लिंक बसेसचा अपवाद वगळून अन्य सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे.
त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वताच्या प्रदक्षिणेसाठी भाविक शहरासह जिल्हाभरातून मोठ्या संख्येने रवाना होत आहेत. महामंडळाकडून जादा बसेस नाशिक-त्र्यंबक-नाशिक या मार्गावर सोडण्यात आल्या आहेत. यामुळे मेळा, नवीन मध्यवर्ती (ठक्कर बाजार) बसस्थानकावर गर्दी होत आहे. रविवारी सायंकाळी याठिकाणी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.
पर्यायी मार्ग असा:
टिळकवाडी सिग्नलकडून येणारी वाहतूक ही सरळ सीबीएस सिग्नलकडे येत पुढे त्र्यंबकनाकामार्गे मुंबई नाक्याकडे रवाना होईल. त्र्यंबक रोडवरील वाहतूक सरळ त्र्यंबकनाका सिग्नलपर्यंत जाऊन तेथून स्मार्टरोडने पुढे सीबीएस सिग्नलकडे मार्गस्थ होईल.
![]()

