नाशिक। दि. ११ ऑगस्ट २०२५: त्र्यंबकेश्वर परिसरात तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिर, ब्रह्मगिरी पर्वतावर फेरीकरिता मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे, तर दुसरीकडे त्र्यंबकेश्वरसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने रविवार सकाळी ८ वाजेपासून २७० जादा बसचे नियोजन शहरातून करण्यात आले आहे.
नवीन बसस्थानक, ठक्कर बाजार येथून त्र्यंबकेश्वरला दर पाच मिनिटाला बस सोडण्यात येईल. रविवारी पहिल्या दिवशी हजारो भाविकांनी त्र्यंबकेश्वर गाठले. सोमवारी रात्रीपर्यंत त्र्यंबकेश्वर येथे ये-जा करण्यासाठी खासगी वाहनांवर निर्बंध असल्यामुळे प्रवाशांची गर्दी कमी होत नाही तोपर्यंत या बस अखंडपणे सेवा देणार आहेत.
बसच्या मार्गातही बदल:
नाशिक, त्र्यंबक, अंबोली, जव्हारमार्गे जाणारी वाहने सातपूर अमृत गार्डन, बारदान फाटा, गोवर्धन, गिरणारे, धोंडेगाव, देवरगाव, वाघेरा फाटा, अंबोली फाटा जव्हारहून जातील. नाशिकसह आंबोली, पहिने, घोटी आणि खंबाळे येथून बस सोडल्या जातील. नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर चालत असलेल्या १६० फेऱ्यांव्यतिरिक्त वरील जादा बसद्वारे फेऱ्या सुटतील.
खासगी वाहनांना प्रवेश बंद:
रविवारी (दि. १०) दुपारी १२ पासून ते सोमवारी (दि. ११) रात्री ८ वाजेपर्यंत त्र्यंबकमध्ये सर्वप्रकारच्या खासगी वाहनांसाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे.