
नाशिक। दि. १० ऑगस्ट २०२५: इंदिरानगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाने शुक्रवारी (दि. ८ ऑगस्ट) सायंकाळी थरारक पाठलाग करून आंतरराज्यीय चेन स्नॅचिंग टोळीतील दोन कुख्यात गुन्हेगारांना ताब्यात घेतले. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि राजस्थान या चार राज्यांमध्ये गंभीर गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे.
गुन्हेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे, पोलीस अंमलदार सागर परदेशी, योगेश जाधव, सागर कोळी, अमोल कोथमिरे, जयलाल राठोड आणि प्रमोद कासुदे हे टवाळखोर व चैन स्नॅचिंग प्रकरणांवर कारवाईसाठी गस्त घालत असताना वडाळा गाव परिसरात संशयास्पद हालचाल करणारी काळ्या रंगाची विनानंबर मोटारसायकल दिसली. चालकाने हेल्मेट आणि मागील आसनावरील इसमाने मास्क व टोपी घातलेली होती.
पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी वेग वाढवत पळ काढला. जवळपासच्या रस्त्यावर गतीरोधकामुळे वेग कमी झाल्याने पथकाने त्यांना थांबवून पकडले. चौकशीत त्यांनी ५ ऑगस्ट रोजी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली. त्या दिवशी ते पुन्हा अशा गुन्ह्याच्या शोधात नाशिकमध्ये फिरत होते, मात्र गुन्हेशोध पथकाने आधीच त्यांना जेरबंद केले.
ताब्यात घेतलेले आरोपी:
मयुर दिनेश बजंरगे (वय ४०, रा. छारानगर, कुबेरनगर, अहमदाबाद, गुजरात)
जिग्नेश उर्फ जुगनू दिनेश घासी (वय ४२, रा. छारानगर, कुबेरनगर, अहमदाबाद, गुजरात)
त्यांच्याकडून विनानंबर मोटारसायकल, मास्क, तीन टोपी व मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासात त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे समोर आले. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.