नाशिक। दि. ८ ऑगस्ट २०२५: नासर्डी पुलाजवळील आंबेडकरवाडी येथे राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला सुगंधित पानमसाला व गुटख्याचा अवैध साठा अन्न, औषध प्रशासन व उपनगर पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. यामध्ये सुगंधित तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ, गुटख्याच्या पाकिटांचा समावेश असून, सुमारे ३ लाख ४९ हजार रुपये किमतीचा हा साधा असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अन्न, औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा देवीदास महाजन यांच्या पथकाने मंगळवारी दुपारच्या सुमारास आंबेडकरवाडी येथील शशिकांत पवार यांनी गोदामासाठी भाडेतत्त्वावर दिलेल्या एका खोलीवर छापा टाकला. या वेळी तेथे संशयित मोहम्मद फिरोज सिद्दिकी (३४, रा. नानावली) हा मालवाहतूक करणाऱ्या वाहनासह आढळून आला.
वाहनचालक संशयित रेहान इम्तियाज खान पठाण (३६, रा. वडाळागाव) हे तेथून पळून गेला. पथकातील अधिकाऱ्यांनी सिद्दिकीकडे विचारपूस केली असता त्याने पवार यांच्याकडून तीन हजार रुपये मासिक भाडेतत्त्वावर खोली घेतल्याचे सांगितले. त्या मालवाहू वाहनासह खोलीची तपासणी केली असता त्या ठिकाणी प्रतिबंधित अवैध साठा आढळून आला. याप्रकरणी महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उपनगर पोलिस ठाण्यात सिद्दीकी, खान-पठाण यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (उपनगर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३३७/२०२५)