मुंबई। दि. ७ ऑगस्ट २०२५: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातो. मात्र जुलै महिन्याचा हप्ता अद्यापही लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नव्हता, त्यामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
याच पार्श्वभूमीवर रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात आली आहे.
लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधनाचा दिवस खास ठरणार आहे. या दिवशी त्यांना सरकारकडून लाडकी बहिण योजनेचा हप्ता भेट मिळणार असून, योजनेअंतर्गत जुलै महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल.
लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला असून त्यातील बहुतांश महिलांनी आपल्या आधार संलग्न बँक खात्याची नोंदणी करून प्रक्रिया पूर्ण केली आहे. जून महिन्यातील हप्ता वेळेवर मिळाल्यानंतर जुलै महिन्याचा हप्ता मात्र जरा उशिराने मिळणार असल्याने महिलांमध्ये उत्सुकता होती. रक्षाबंधनासारखा बहिणींसाठी विशेष असणारा सण लक्षात घेऊन हप्ता वितरीत केला जाणार आहे.