
नाशिक। दि. ६ ऑगस्ट २०२५: पायी जाणाऱ्या इसमाच्या हातातील मोबाईल खेचणाऱ्या तीन संशयितांना अटक करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने चांदशी-आनंदवली रोडवर ही कारवाई केली. संशयितांकडून लुटीचे २३ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. विकी प्रभाकर काळे, ऋतिक रामराव हिरे व शुभम सुभाष इंगळे (सर्व रा. सातपूर) अशी या संशयितांची नावे आहेत.
पथकाचे चेतन श्रीवंत, महेश साळुंके, राहुल पालखेडे, राम बर्डे गस्त करत असतांना लुटीचा मोबाईल विक्री करण्याकरीता एमएच ०१ ईएच९६५४ या क्रमांकाच्या दुचाकीने चांदशी शिवारात काही व्यक्ती येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचला. वरील संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत २३ मोबाईल लुटल्याची कबुली दिली.
नाशिक शहरासह परिसरात पायी जाणाऱ्यांच्या हातातील मोबाइल खेचण्याचे प्रकार वाढले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू होता. यातच या तीन मोबाईल चोरांना जेरबंद करण्यात आल्याने मोबाईल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
पायी मोबाइलवर बोलत जाणाऱ्या व्यक्तींना लक्ष्य करत मोबाइल लुटत होते. अल्पवयीन मुलाकडे विक्री करण्यास हे मोबाईल दिले होते. त्याला ताब्यात घेत चौकशी केली. त्याच्याकडे १९ मोबाइल मिळाले.
– मधुकर कड, वरिष्ठ निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट १