
नाशिक | २ ऑगस्ट २०२५: सिडको परिसरातील वाढत्या अनधिकृत अतिक्रमणांमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, वाहतूक कोंडी व अपघातांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने आता अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी कंबर कसली आहे.
मनपा अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सिडको विभागातील विविध भागांची पाहणी केली. या दरम्यान, अनधिकृत अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध लवकरच कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सिडको परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे बकाल अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. विशेषतः पवननगर भाजी मार्केट व पाथर्डी फाटा परिसरात फेरीवाल्यांनी उघडपणे अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या भागात नियमित वाहतूक कोंडी होत असून, नागरिकांना व वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
यापूर्वीदेखील पाथर्डी फाटा परिसरात महापालिकेने अतिक्रमण हटाव मोहिम राबवली होती. मात्र, अतिक्रमण पुन्हा वाढल्याने आता पुन्हा एकदा अधिक तीव्र आणि निर्णायक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नागरिकांच्या सुरळीत वाहतुकीसाठी आणि सुरक्षिततेसाठी सिडको विभाग अतिक्रमणमुक्त करणे अत्यावश्यक झाले असून, यामध्ये महापालिका कोणतीही तडजोड करणार नसल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
![]()

