
नाशिक। दि. १ ऑगस्ट २०२५: परिमंडळ-२मधील नाशिकरोड, उपनगर व देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील विविध प्रकारच्या चोरीच्या गुन्ह्यांची उकल करून जप्त करण्यात आलेला सुमारे पन्नास लाखांचा मुद्देमाल २५ फिर्यादींना पुन्हा सन्मानपूर्वक पोलिसांकडून प्रदान केला.
चोरीला गेल्या मौल्यवान वस्तू, दागिने, पुन्हा पदरात पडल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडी, दुचाकी चोरी, मोबाईल चोरी, सोन्याच्या दागिन्यांची चोरी अशा १४ गुन्ह्यांची उकल करून ३२ लाख १४ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ११ गुन्ह्यांमधील १४ लाख १३ हजार किमतीचा व देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विविध गुन्ह्यांतील ३ लाख १८ हजारांचा असा एकूण ४९ लाख ४५ हजाराचा मुद्देमाल गुन्हेगारांकडून पोलिसांनी हस्तगत केला होता.
याबाबत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिकरोड पोलिस ठाण्यात बुधवारी सायंकाळी संबंधित २५ फिर्यादींना बोलावून पोलिस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या हस्ते या मुद्देमालाचे वाटप करण्यात आले.