नाशिक। दि. २६ जुलै २०२५: पुण्याच्या जीएसटी गुप्तचर विभागाने देवळाली परिसरात मोठी धडक कारवाई करत एक प्रकरण उघडकीस आणले आहे. बनावट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून शासनाची फसवणूक केल्याच्या संशयावरून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या घरावर छापा टाकण्यात आला असून, त्याच्याविरोधात सखोल चौकशी सुरू आहे.
ही कारवाई देवळाली गावाजवळील एका निवासी इमारतीत करण्यात आली. संशयित इंजिनिअर याच ठिकाणी वास्तव्यास असल्याचे समजते. कारवाईदरम्यान, संबंधित व्यक्तीकडून एक पिस्तूल आणि सहा जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत. या घटनेमुळे प्रकरण केवळ आर्थिक गुन्ह्यापुरते मर्यादित न राहता, शस्त्रसाठ्याच्या दिशेनेही वळले आहे. त्यामुळे यंत्रणांनी याबाबत स्वतंत्र तपास सुरू केला आहे.
बनावट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून शासनाची फसवणूक?
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित सॉफ्टवेअर इंजिनिअरवर बनावट सॉफ्टवेअर तयार करून शासनाची फसवणूक करत असल्याचा संशय आहे. या घडामोडींमुळे नाशिकमधील देवळाली परिसरात खळबळ उडाली आहे. जीएसटी गुप्तचर विभागाने ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पाडली असून, चौकशीतून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. संबंधित व्यक्तीची कसून चौकशी सुरू असून, त्याचे नेटवर्क, आर्थिक व्यवहार आणि सॉफ्टवेअरचा वापर याबाबत तपास केला जात आहे.