नाशिक। दि. २५ जुलै २०२५: आजपासून होणाऱ्या श्रावण मासानिमित्त शहरातील सर्व शिव मंदिरांमध्ये सज्जतेसह गर्दीचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.
२८ जुलैला येणाऱ्या पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त कपालेश्वर मंदिर, सोमेश्वर मंदिर, नीळकंठेश्वर, मनकामेश्वर, नाशिकरोडच्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी हजारो भाविक येणार असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीनेदेखील उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रमुख मंदिरे पहाटे ४ पासून रात्री ११ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुली राहणार आहेत.
या महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार दि. २८ जुलैला येणार असल्याने श्रावणाच्या प्रारंभापासून शिवमंदिरांमध्ये पूर्वतयारीला वेग देण्यात आला होता. संभाव्य गर्दीच्या नियोजनासह मंदिरांची स्वच्छता, सजावट आदी बाबींवर मंदिर व्यवस्थापनाकडून भर देण्यात आला. कपालेश्वर आणि सोमेश्वर मंदिर पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त पहाटे ४ पासून रात्री १२ वाजेपर्यंत भाविकांना दर्शनार्थ खुले ठेवण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीचा भाग म्हणून बहुतांश शिवमंदिरांमध्ये दीप अमावास्येपासूनच मंदिरांचे आवार विद्युत रोषणाईने झळाळून निघाले होते.
पहाटे ५ ला महारुद्राभिषेक:
श्रावणी सोमवारी कपालेश्वर आणि सोमेश्वर मंदिरात पहाटे ५ वाजता महारुद्राभिषेक, महापूजन आणि महाआरती आदी धार्मिक उपक्रमांनंतर नित्यसेवेस सुरुवात होणार आहे. कपालेश्वर मंदिर मंदिर रात्री १२ वाजेपर्यंत खुले ठेवण्यात येणार आहे.