
मुंबई। दि. १७ जुलै २०२५: महाराष्ट्रातले मंत्री, मोठे अधिकारी हे हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत, असे नाना पटोले यांनी विधानसभेत बुधवारी सांगितले होते. आज (गुरुवारी) सभागृहात “मुंबई मंत्रालय, ठाणे, नाशिक हनी ट्रॅपचे केंद्र बनली आहेत”, असे म्हणत पटोलेंनी आपल्याकडे असलेला पेन ड्राईव्ह हात वर करून दाखवला.
“माझ्याकडे पेन ड्राईव्ह देखील आहे. सरकारचे मत असेल तरी आम्ही तो दाखवूही शकतो”, असे पटोले यांनी म्हटले. “हनी ट्रॅपच्या माध्यमातून राज्याची महत्त्वाची कागदपत्रं अँटी सोशल मूव्हमेंटच्या हातात चालली आहेत. मला कोणाचे चरित्र हनन करायचे नाही. मात्र, याबाबत सरकार गंभीर नाही. साधे निवेदन करायला तयार नाही. अध्यक्षांनी याबाबत निर्देश द्यावेत.’ असे पटोले म्हणाले.
नाशिकचे हनी ट्रॅप प्रकरण गंभीर आहे, असे आमदार जयंत पाटील म्हणाले. त्यांनी यासारख्या गंभीर मुद्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी निवेदन करायला हवे, अशी मागणी केली. तर, याची दखल घेतली असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.