नाशिक। दि. १५ जून २०२५: उसनवार दिलेल्या रकमेतील शिल्लक एक लाख रुपयांची मागणी मित्राने केली असता रक्कम देण्यास नकार देत मित्राला व त्याच्या कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन पाच लाखाची खंडणी मागत ५० हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित आरोपी तुषार कैलास सानप (रा. गंगापूररोड) यास शनिवारी (दि.१४) सायंकाळी ६.३० वाजता अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, गंगापुररोड भागात फ्लॅट घेण्यासाठी फिर्यादी शुभम राजेंद्र घुगे (२६, रा. सिन्नर) यांच्याकडून त्यांचा मित्र असलेला तुषार याने २०२३ साली फ्लॅट खरेदी करण्याकरिता उसनवार पाच लाख रुपये घेतले होते. त्यापैकी चार लाख रुपये त्याने परत केले. उर्वरित एक लाख रुपयांची मागणी घुगे यांनी त्याच्याकडे केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देत टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.
तसेच त्यांच्या कुटुंबीयांना जिवे ठार मारण्याची धमकी देत राजेंद्र घुगे यांच्याकडे पाच लाखांची खंडणीची मागणी केली. तसेच चालू घुगे यांच्या मोटारीला तुषार याने त्याच्या मोटारीने अडवून जीवे ठार मारण्याची धमकी देत ५० हजारांची बळजबरीने खंडणी उकळल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. (गंगापूर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: १४९/२०२५)
![]()

