नाशिक: गंगापूर रोडवरील वाईन शॉपवर दगडफेक करून खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक !

नाशिक। दि. १२ जून २०२५: शहरातील गंगापूर रोड परिसरात वाईन शॉपवर दगडफेक करून खळबळ माजवणाऱ्या दोन जणांना गंगापूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला आणि काही तासांतच दोघांनाही जेरबंद केलं.

ही घटना मंगळवार, दिनांक ११ जून रोजी रात्रीच्या सुमारास, नेर्लेकर चौकाजवळील ‘द मदिरा वाईन्स’ या दुकानात घडली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, रात्री १२.५० च्या सुमारास दोन इसमांनी वाईन शॉपच्या काचेवर दगडफेक करत दहशत निर्माण केली. या प्रकारामुळे शॉर्टसर्किट होऊन दुकानासोबतच संपूर्ण इमारतीला आग लागण्याचा धोका निर्माण झाला होता.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: एटीएममध्ये कार्ड लॉक झाल्याचा गैरफायदा घेऊन कार्ड काढून १ लाखांची फसवणूक

गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्विंदरसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आले. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपींची ओळख पटली. या प्रकरणातील संशयित आरोपी: शिवाजी पोपट उर्फ बाळा गांगुर्डे (रा. फ्लॅट क्र. २, महारुद्र अपार्टमेंट, सावरकरनगर, गंगापूर रोड) आणि त्याचा साथीदार संशयित राजू हनुमंता माळी (रा. फ्लॅट क्र. ११, वक्रतुंड अपार्टमेंट, चांदशी, ता. जि. नाशिक) यांना अटक करण्यात आली असून, दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

⚡ हे ही वाचा:  मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; नाशिक जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ‘यलो अलर्ट’

वाईन शॉपचे मालक प्रणिल किशोर ठाकरे यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: प्रेयसीच्या पतीचा खून करून फरार झालेल्या प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक !

तपासादरम्यान उघडकीस आले आहे की, आरोपी हे स्थानिक दुकानदारांवर दहशत निर्माण करून त्यांच्याकडून खंडणीच्या स्वरूपात पैसे आणि वस्तू उकळत होते. याप्रकरणी पोलिसांनी इतर पीडित दुकानदार आणि नागरिकांना पुढे येण्याचं आवाहन केलं आहे. कोणताही व्यक्ती जर खंडणी मागत असेल किंवा धमकी देत असेल, तर नागरिकांनी न घाबरता थेट गंगापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले असून तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, हेही स्पष्ट करण्यात आलं आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here