नाशिकमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या ३ बांग्लादेशी नागरिकांसह एका स्थानिक तरुणावर गुन्हा दाखल

नाशिक। दि. ११ जून २०२५: नाशिक शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या तीन बांग्लादेशी नागरिकांसह एका स्थानिक तरुणावर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
दिनांक ८ जून २०२५ रोजी पोलीस आयुक्तांना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली होती की, नाशिकमध्ये एक बांग्लादेशी महिला एका पुरुषासोबत राहत आहे. यानंतर तात्काळ कारवाईसाठी पोलीस उपआयुक्त (गुन्हे व विशेष शाखा) प्रशांत बच्छाव व सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांनी गुन्हे शाखा युनिट क्र. २ च्या पथकाला सूचना दिल्या.
प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर, सहायक पोलीस निरीक्षक डॉ. समाधान हिरे आणि प्रवीण माळी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि माहितीच्या आधारे छापा टाकून संबंधित महिला आणि तिच्या जोडीदारास ताब्यात घेतले. चौकशीत सदर महिलेला आरोपी पुरुषाने आपली पत्नी असल्याचे सांगितले आणि ती बांग्लादेशी असल्याचे मान्य केले.
पोलिस तपासात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. संबंधित महिला २०१७ साली मामाच्या मदतीने पहिल्यांदा भारतात आली होती आणि नवी मुंबईतील घनसोली येथे वास्तव्यास होती. फेसबुकवरून ओळख झालेल्या नाशिकच्या पुरुषासोबत प्रेमसंबंधात आल्यावर ती परत बांग्लादेशात गेली होती. तेव्हा ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले आणि ६ जुलै २०१८ रोजी तिने एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर ती पुन्हा मुलीसह २०१८ मध्ये बेकायदेशीरपणे भारतात परतली.
या काळात ती आणि संबंधित पुरुष ‘लिव्ह-इन’ नात्यात राहत होते. नंतर ती पुन्हा बांग्लादेशात गेली आणि २०१९ मध्ये अधिकृत पासपोर्ट व टुरिस्ट व्हिसावर भारतात आली. मात्र व्हिसा संपल्यानंतरही ती भारतातच थांबली आणि स्वतःचा पासपोर्ट फाडून टाकला. २०२२ मध्ये आरोपी पुरुषाने बांग्लादेशात जाऊन धर्म व नाव बदलून तिच्याशी निकाह केला. त्यानंतर ही महिला पुन्हा अवैधरित्या भारतात आली आणि सध्या नाशिकमध्ये राहत होती.
सदर महिलेसोबत तिची मुलगीही होती. या दोघांनी संगनमताने मुलीचा बनावट जन्म दाखला, तसेच महिलेचे बनावट आधारकार्ड, मतदान ओळखपत्र व पॅनकार्ड तयार केले. विशेष म्हणजे, या महिलेने भारतात मतदान केल्याची कबुली देखील पोलिसांसमोर दिली आहे.
या महिलेचा मामा आणि मामी यांनाही पुणे ग्रामीणच्या शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक करण्यात आली आहे. ते देखील भारतात बेकायदेशीरपणे राहत होते आणि त्यांनी सुरुवातीस तिला आश्रय दिला होता.
या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता, पासपोर्ट नियम, परकीय नागरिक कायदा व परकीय नागरिक आदेश यांच्याअंतर्गत गुन्हा क्रमांक १९८/२०२५ दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
![]()

