नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनापाठोपाठ सारी आणि इली या आजारांनी थैमान घातले आहे. या आजारांवर आळा बसण्यासाठी या अभियानांतर्गत जास्तीत जास्त लोकांच्या घरापर्यंत पोहोचून आरोग्य तपासणी तर केलीच जाणार आहे. कोरोनाबाधीतांना शोधून काढण्यासाठी राज्यशासनाने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेतून २५ ऑक्टोंबरपर्यंत महापालिकेच्या क्षेत्रातील सर्व घरांना भेटी देऊन सारी व इतर आजाराचे रूग्ण शोधण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
त्यासाठी शहरात आठशे पथकांची नेमणूक केली आहे. या माध्यमातून साडेचार लाख घरांतील सुमारे १९ लाख नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. अशी माहिती देखील आयुक्त केदार जाधव यांनी दिली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढून पन्नास हजारांचा आकडा पार होईल की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेसमोर मोठे आव्हान आहे. म्हणून रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाने १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर २०२० या कालावधीमध्ये दोन टप्प्यात ‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. या सर्वेक्षणामार्फत मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, किडनी आजार, अवयव प्रत्यारोपण, दमा इत्यादी आजारांबाबत देखील माहिती घेतली जाणार आहे. तरी नेमलेल्या पथकांना नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त जाधव यांनी केले आहे.