नाशिक: समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा उद्यापासून (दि. ५ जून) होणार खुला

नाशिक। दि. ४ जून २०२५: बहुप्रतीक्षित समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा गुरुवारी (दि.५) दुपारी १२ वाजेपासून खुला होणार आहे. इगतपुरीतील पिंप्रीसदो येथे असलेल्या देशातील सर्वाधिक लांबीच्या बोगद्याच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फीत कापून त्याचे उद्घाटन होईल. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने येथे येणार असून, बोगद्याचा ७.८ किमी आणि पुढे असलेल्या ९० मीटर उंचीच्या पुलावरून म्हणजे १० किमीचा प्रवास मुख्यमंत्री करतील, असे नियोजन आहे.

राज्याची उपराजधानी नागपूर आणि राजधानी मुंबई या शहरांना जोडणारा भाजप सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपूर येथे झाले आहे. त्यानंतरच्या टप्याचे शिर्डीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तर आता ७६ किमीच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने दुपारी १२ वाजता पिंप्रीसदो येथे येतील.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: शिक्षकांकडून मागितली दोन लाखांची लाच; उपशिक्षणाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल !

बोगद्याच्या सुरुवातीला फीत कापून उद्घाटन केले जाईल. त्यानंतर समृद्धी महामार्गावरुन पुढे १० किमीचा वाहनाने प्रवास करतील. या १० किमीमध्ये ७.८ किमीचा प्रवास ते बोगद्यातून करणार आहेत. विशेष म्हणजे याच टप्प्यात आलेला अत्यंत उंच म्हणजे ९० मीटर उंचीचा पूल आहे. त्याचीही ते पाहणी करतील आणि त्यावरून प्रवास करतील. त्यानंतर पुन्हा पिंप्रीसदो येथे परत येतील. तेथे पत्रकारांशी संवाद साधतील. नंतर लगेचच हेलिकॉप्टरने ते परतीचा प्रवास करतील.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: आखाड्यांना लवकरच मुलभूत सोईसुविधा उपलब्ध करून देणार- आयुक्त शेखर सिंह

दृष्टीक्षेपात महामार्ग
👉 इगतपुरी ते आमणे ७६ कि.मी.चा समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा
👉 ३५ मीटर रूंद आणि ६ लेन असलेला दुहेरी बोगदा असा हा मार्ग असणार आहे.
👉 मुंबईकरांना फक्त ८ तासांत नागपूर गाठता येणार आहे.
👉नाशिक येथून मुंबई अडीच तासांत गाठणे शक्य.
👉समृद्धी महामार्ग हा ६ लेनचा, १२० मीटर रुंदीचा आणि ७०१ किलोमीटर लांब महामार्ग
👉ताशी १५० कि. मी. गतीने प्रवासासाठी महामार्गाचे डिझाइन.
👉 महामार्गावर ६५ उड्डाणपूल, २४ इंटरचेंज, कसारा घाटातून जाताना ६ बोगदे आणि अनेक वाहन तसेच पादचारी अंडरपास.
👉 इगतपुरी ते मुंबई दरम्यान कसारा घाटाजवळ ८ कि.मी. लांब जुळ्या बोगद्यांपैकी एक बनवण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790