नाशिक | ४ जून २०२५: मान्सूनच्या आगमनानंतरही नाशिककरांना समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला पावसाने गारवा दिला असला तरी, जूनच्या सुरुवातीला तापमान पुन्हा वाढताना दिसत आहे. नागपूर वेधशाळेच्या अंदाजानुसार, आज दुपारपर्यंत उकाडा जाणवणार असून, त्यानंतर शहरातील काही भागांत हलक्याफुलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.
मंगळवारी (दि. ३) नाशिकरोड व जेलरोड परिसरात दुपारी हलका पाऊस झाला. त्याचवेळी, सकाळपासून सरासरी ताशी १२ किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. आजही वाऱ्याचा वेग १२ ते १५ किलोमीटर प्रतितास दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
मंगळवारी शहरात किमान तापमान २३.७ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. या तापमानामुळे सकाळपासून उकाड्याची तीव्रता जाणवली, मात्र दुपारनंतर थोडाफार दिलासा मिळाला.
राज्यात बहुतांश भागांत मान्सून वेळेआधी दाखल झाला असला, तरी पुढील वाटचाल काहीशी मंदावली आहे. नागपूर हवामान केंद्रानुसार, येत्या दोन दिवसांत राज्यभरात ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नाशिकमध्ये बुधवार आणि गुरुवारीही अशाच प्रकारच्या हवामानाची शक्यता आहे.
मे महिन्यात नाशिकमध्ये एकूण १८७ मिमी पावसाची नोंद झाली. मात्र, १ जूनपासून आजतागायत शहरात पावसाची विश्रांती आहे.
![]()

