
नाशिक (प्रतिनिधी): महावितरणच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यभरासह नाशिक परिमंडलामध्ये दि. १ ते ६ जून दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत ‘रन फॉर सेफ्टी’ मॅरेथॉनची सुरुवात विद्युत भवन, नाशिक येथून आज रविवारी सकाळी नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांच्या हस्ते झेंडी दाखवून करण्यात आली. विद्युत सुरक्षिततेच्या जनजागृतीसाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांनी कुटुंबासह उत्साहात सहभाग नोंदविला.
विद्युतभवन, बिटको येथील महावितरणच्या परिमंडळ कार्यालय परिसरातून ‘रन फॉर सेफ्टी’ मॅरेथॉनला सकाळी साडेसात वाजता नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी झेंडी दाखवून शुभारंभ केला. जेलरोड मार्गे मार्गक्रमण करीत, महाजन हॉस्पिटल, सानेगुरूजी नगर, पाटीदार भवन येथून याचा समारोप विद्युत भवन येथे झाला.
“आम्ही सुरक्षेचे शिल्पकार, शुन्य विद्युत अपघाताने करू महावितरणचे ध्येय साकार” हे ब्रिद घेऊन महावितरणच्या महिला व पुरुष अधिकारी, अभियंते, कर्मचारी व जनमित्र यांनी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी देखील या मॅरेथॉनमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. महावितरण कार्यालयात दि.१ ते ६ जून २०२५ दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताहात विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या निमित्ताने आयोजित विद्युत सुरक्षा सप्ताहादरम्यान मॅरेथॉन, रॅली, निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच ग्राहकांना सुरक्षाविषयक ई-मेल व एसएमएस पाठविणे, भित्तीपत्रके, चित्रफिती आणि जनजागृती रॅली अशा विविध माध्यमांव्दारे विद्युत सुरक्षेविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे.
याप्रसंगी नाशिक मंडळाचे अधिक्षक अभियंता राजेश थुल, कल्याण १ मंडळाचे अधिक्षक अभियंता अनिल थोरात, सहाय्यक महाव्यवस्थापक महेश बुरंगे, कार्यकारी अभियंते योगेश निकम, नंदकिशोर काळे, चेतन वाडे व प्रदीप वट्टमवार, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांनी देखील सहभाग नोंदविला.
![]()

