नाशिक। दि. ३१ मे २०२५: आरोग्य विभागात कंत्राटी कामगारांची भरती होणार असल्याचे भासवत धुळे, नाशिक येथील ९० बेरोजगारांकडून कमिशन म्हणून घेतलेल्या एक कोटी ३७ लाखांचा अपहार करत बेरोजगारांना फसविल्याप्रकरणी महिलेसह अलिबाग येथील संशयिताच्या विरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कविता भदाणे (रा. ध्रुवनगर), वैभव पोळ (रा. अलिबाग) अशी संशयितांची नावे आहेत. दरम्यान, पोळने आपण कंत्राटी कामगार भरतील करणारे अधिकृत परवानाधारक असल्याचा दावा केला आहे.
कुणाल भदाणे (रा. साक्री, धुळे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जुलै २०२३ मध्ये अशोकस्तंभ येथील शिवांजली सोल्युशन प्लेसमेंट सर्व्हिस येथे संशयित कविता भदाणे व वैभव पोळ यांनी संगनमत करत साक्री तालुक्यातील ९० उमेदवारांना धुळे आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार असून ही प्रक्रिया शिवांजली सोल्युशनमार्फत राबवली जाणार असल्याचे सांगण्यात आले. ९० उमेदवारांकडून सुरुवातीला एक कोटी ४० लाख रुपये घेतले. त्यापैकी कविता भदाणे यांनी त्यांच्या बँक खात्यावर काही रक्कम रोख स्वरूपात आणि एक कोटी ११ लाख संशयित वैभव पोळ यांना दिले.
सहा महिन्यांनंतरही नोकरी मिळत नसल्याने काही उमेदवारांनी पैशांची मागणी करत तगादा लावला. इतर उमेदवारांनी देखील पैशांकरिता तगादा लावला असता संशयित भदाणे व पोळ यांनी एक कोटी ३७ लाखांचा अपहार करत उमेदवारांना कंत्राटी नोकरी लावून न देता फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत. (सरकारवाडा पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: १५८/२०२५)
![]()

