
नाशिक (प्रतिनिधी): घरफोडीच्या गुन्ह्यातील चार संशयितांना अटक करण्यात आली. इंदिरानगर पोलिसांनी सोनगाव (ता. निफाड, सायखेडा) येथे ही कारवाई केली. चौकशीत घरफोडी करणारी टोळी निष्पन्न झाली. सिद्धेश अशोक आडभाई, किरण बाळासाहेब मुरादे, आदित्य अरुण गावले, तुषार अशोक गरुड (रा. सायखेडा) अशी या संशयितांचे नावे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शोधपथकाचे संतोष फुंदे यांना इंदिरानगर परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित सायखेडा येथे असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाचे पवन परदेशी, दीपक शिंदे, सागर कोळी यांच्या पथकाने सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने सिद्धेश आडभाई नाव सांगितले.
अधिक चौकशीत त्याने वरील तीन संशयितांच्या मदतीने इंदिरानगर परिसरात घडफोडी केल्याची कबुली दिली. संशयितांकडून नऊ तोळे सोन्याची लगड जप्त करण्यात आली. संशयित टोळीकडून घरफोडीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
![]()

