नाशिक जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सतर्क, औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध- जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे

नाशिक, दि. २९ मे २०२५: आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी दिली आहे.

जिल्हा शल्यचिकित्स्क डॉ. शिंदे यांनी सांगितले की, जिल्हा शासकीय रुग्णालयात पाचशे खाटांची सुविधा आहे. याशिवाय मालेगाव येथे सामान्य रुग्णालय व महिला रुग्णालय, कळवण, चांदवड, मनमाड, निफाड, येवला, त्र्यंबकेश्वर येथे उपजिल्हा रुग्णालय कार्यान्वित आहे, तर गिरणारे, दाभाडी, झोडगे, अभोणा, नांदगाव, लासलगाव, पिंपळगाव, सिन्नर, दोडी, नगरसूल, सटाणा, डांग सौंदाणे, नामपूर, देवळा, उमराणे, सुरगाणा, बाऱ्हे, इगतपुरी, घोटी, हरसूल, पेठ, दिंडोरी, वणी येथे प्रत्येकी ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय कार्यरत आहेत.

⚡ हे ही वाचा:  नाशिक परिक्रमा मार्गाच्या भू संपादन प्रक्रियेत योगदान द्यावे- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

या रुग्णालयांमध्ये २४ तास वैद्यकीय सेवा उपलब्ध असते. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. १०८ रुग्णवाहिकेसह प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात रुग्ण वाहिका उपलब्ध आहे. याबरोबरच जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद़ही आहेत.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालयांमध्ये किमान महिनाभर पुरतील एवढ्या औषधांचा साठा आहे. आवश्यकता भासली, तर स्थानिक पातळीवर औषधे खरेदी केली जातात. पावसाळ्यात काही वेळेस सर्पदंशाच्या घटना घडतात. प्रत्येक शासकीय रुग्णालयात सर्पदंश प्रतिबंधक लशी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तसेच सर्पदंश झाल्यास करावयाचे प्रथमोपचार याविषयी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

⚡ हे ही वाचा:  महावितरणच्या ऑनलाईन सेवेमुळे ५८ हजार ग्राहकांना नाव बदलाचा तर १० हजार ग्राहकांना भारवाढीचा लाभ

नागरिकांनी आरोग्याविषयी काही तक्रार असेल, तर तत्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात जावून आरोग्याची तपासणी करून घ्यावी. तसेच पावसाळ्यात जलविकार उदभवण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर पाणी शुद्ध राहील याची दक्षता घ्यावी. शक्यतो उकळून थंड केलेल्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा.- डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790