नाशिक (प्रतिनिधी): राज्यात मागील तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या तीव्र उष्णतेला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या आठ दिवसांत महाराष्ट्रातील विविध भागांत हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. यामुळे तापमानात काही प्रमाणात घट होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः ६ व ७ मे रोजी नाशिकसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागांत गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सध्या अनुभवास येत असलेली उष्णतेची तीव्रता गेल्या काही वर्षांच्या तुलनेत अधिक आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, मागील काही वर्षांत मे महिन्यात उष्णतेची लाट सरासरी तीन दिवस राहायची, मात्र यंदा ती पाच दिवस टिकत आहे. १ ते ४ मे दरम्यान राज्यातील तापमान सरासरी ४० अंश सेल्सियसच्या आसपास होते. ५ मे रोजीही तापमानात फारशी घट होण्याची शक्यता नाही. मात्र त्यानंतर, म्हणजेच ६ मेपासून हवामानात बदल होणार असून, टप्प्याटप्प्याने पावसाच्या सरी पडणार आहेत.
राजस्थान, आसाम, बांगलादेश आणि उत्तर प्रदेश या भागांमध्ये तयार झालेली द्रोणीय परिस्थिती आणि पश्चिम हिमालयात आलेल्या पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे देशभरात उष्णतेची लाट ओसरत आहे आणि त्याऐवजी पावसाळी वातावरण निर्माण होत आहे. सध्या देशाच्या निम्म्याहून अधिक भागात पावसाची स्थिती आहे.
महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘यलो अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. हवामान विभागानुसार, राज्यभर पावसाची ही स्थिती शुक्रवारपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790