नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध- मंत्री गिरीश महाजन

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६६ वा स्थापना दिवस साजरा

नाशिक, दि. 1 मे, 2025: त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळा स्वच्छ व हरित होण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. तसेच नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी येथे केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ पोलिस संचलन मैदानावर आज सकाळी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलिस महानिरिक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने आदी उपस्थित होते. यावेळी पोलिस दल, गृह रक्षक दल, राज्य उत्पादन शुल्क, अग्निशमन दल, नागरी संरक्षण दल, शहर पोलिस वाहतूक शाखेच्या तुकडीने संचलन करून मानवंदना दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कार, प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: भरधाव मोटारसायकलच्या धडकेत २४ वर्षीय युवतीचा मृत्यू

मंत्री महाजन म्हणाले की, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सन २०२६- २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्याचे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून नियोजन सुरू आहे. गेल्या मार्च महिन्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिक/त्र्यंबकेश्वर येथे भेट देऊन सिंहस्थ कुंभमेळा कामकाजाचा आढावा घेतला. स्वच्छ आणि सुंदर, पर्यावरण पूरक कुंभमेळ्याच्या कामाला चालना देण्यात येईल. तसेच कुंभमेळ्यानिमित्त निर्माण होणाऱ्या पायाभूत सोयी सुविधांना प्राधान्य देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी कोणत्याच गोष्टींची उणीव जाणवू देणार नाही. तसेच स्वच्छ व हरित कुंभ पार पडण्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला तीर्थक्षेत्राचा ‘अ’ दर्जा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

जिल्ह्यातील काही वाड्या, गावांना सध्या पाणीटंचाई जाणवत आहे. अशा ७८ वाड्या, गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच दहा गावांसाठी विहीर अधिग्रहण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध धरणांमध्ये सुमारे ३३ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही टक्केवारी समाधानकारक आहे. प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: मोटारसायकल स्लिप होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १ हजार २२२ योजनांचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये एक हजार २९६ गावांचा समावेश आहे. आतापर्यंत ६ लाख ७० हजार ९३६ कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली आहे हे सांगताना मला आनंद होत आहे. उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, असेही मंत्री महाजन यांनी सांगितले.

आगामी खरीप हंगामासाठी नाशिक जिल्ह्यात ६ लाख ४१ हजार ७७१ हेक्टर क्षेत्रात विविध पिकांच्या पेऱ्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी आवश्यक बि- बियाणे, रासायनिक खते पुरेश्या प्रमाणात उपलब्ध राहतील, अशी दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी ॲग्री स्टॅक फार्मर आयडी म्हणून नोंदणी करून घ्यावी. यासह कृषी विभागाच्या माध्यमातून विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करीत शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

⚡ हे ही वाचा:  मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; नाशिक जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ‘यलो अलर्ट’

नाशिक जिल्ह्यात खरीप पीक कर्ज वितरणाला सुरुवात झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून १५ हजार १४५ सभासदांना १४८ कोटी रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे. पावसाळा जवळ आला आहे. यामुळे कर्ज वितरण प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. जिल्हा वार्षिक योजना सन २०२५- २६ करीता सर्वसाधारण योजनेसाठी ९०० कोटी, आदिवासी उपयोजनेसाठी ४४३ कोटी रुपये, तर अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १०१ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर आहे.

पोलिस दलाने नावीण्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी आणि तक्रारींची तत्काळ दखल घेता यावी म्हणून बळीराजा सेल कार्यान्वित केला आहे. आतापर्यंत ९५८ शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. पोलिस दलाने या शेतकऱ्यांना २ कोटी ३३ लाख ४२ हजार रुपये परत मिळवून दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here