
नाशिक । १ मे २०२५: सातपूर एमआयडीसीमध्ये दोन दिवसांपूर्वी चोरट्यांनी एक बंद गुदाम फोडून त्यामधून सुमारे कॉपर प्लेट्स चोरी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने तपास करत पाच जणांच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून सुमारे २ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
फिर्यादी गणेश सूर्यवंशी (४०, रा. पिंपळगाव खांब) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एरियन फिनीसिंग्स नावाच्या कंपनीच्या गुदामामधून कॉपर धातूच्या काही प्लेट्स चोरी गेल्या होत्या. सातपूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी संशयितांबाबतची गोपनीय माहिती हवालदार सुनील आहेर, तेजस मते यांना मिळाली. त्यांनी प्रभारी अधिकारी सहायक निरीक्षक हेमंत तोडकर यांना याबाबत कळविले. तोडकर यांनी तातडीने सहायक निरीक्षक समाधान हिरे, उपनिरीक्षक मुख्तारखान पठाण, भारती देवकर, विलास गांगुर्डे, प्रेमचंद गांगुर्डे, नंदकुमार नांदुर्डीकर, सुनील आहेर, अतुल पाटील आदींचे पथक तयार करत शरणपूर बेथेलनगर येथे रवाना केले.
पथकाने सापळा रचून संशयित रोहित सुरेश गवई (१९, रा. शरणपूर रोड), विवेक सतीश बत्तिसे (१९) हे दोघे तेथे आले असता पथकाने त्यांना जाळ्यात घेतले.
त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांचे साथीदार संशयित लकी भंडारे, प्रेम भगत, आसाराम धुताडे यांच्या मदतीने चोरी केल्याची माहिती दिली. चोरी केलेले कॉपर धातूचे सुटे पार्ट विक्रीसाठी त्यांनी संशयित अजय मैंदकर यांच्या ओळखीच्या रिक्षामध्ये (एमएच १५ एफयू ४०३५) भरणा करून दिंडोरीनाका येथील रफिक स्क्रॅप सेंटर येथे घेऊन गेल्याचे सांगितले. भंगार व्यावसायिक अजहर अत्तार यास व सारडासर्कल येथील व्यावसायिक गुलामखान पठाण यांना विक्री केल्याची कबुली दिली.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790