नाशिक | दि. 29 एप्रिल, 2025 (जिमाका वृत्तसेवा): दिव्यांग कल्याण विभागाच्या 100 दिवसांचा कृती आराखडा या उपक्रमांतर्गत प्रादेशिक व जिल्हा स्तरावर कार्यालय सुरू करणे या बाबीचा समावेा करण्यात आला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात सामाजिक न्याय भवन आवारातील शासकीय अंधशाळेच्या इमारतीत जिल्हास्तरीय दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय 1 मे 2025 पासून कार्यान्वित होणार असल्याची माहिती नाशिकचे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी भरत चौधरी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
दिव्यांग कल्याण विभागाचे जिल्हा स्तरावरील कामकाज सद्यस्थितीत जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्यामार्फत हाताळण्यात येत आहे. जिल्हस्तरीय कार्यालय स्वतंत्रपणे सुरू करण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागातील कार्यरत वैद्यकीय समाजिक कार्यकर्ता मगन चौधरी यांच्याकडे जिल्हा दिव्यांग अधिकारी या पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.
या कार्यालयामार्फत दिव्यांग शाळा संहिता, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील तरतुदीनुसार निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय, परिपत्रके, अधिसूचना, नियम इत्यादी बाबत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद यांच्यामार्फत सद्यस्थितीत होणारी कामे करण्यासाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद यांना देण्यात आलेले प्रशासकीय व वित्तीय अधिकारी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांना सोपविण्यात आले आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.