नाशिक (प्रतिनिधी): विधवा भावजयीच्या नावावर घर असतानादेखील तिला मारहाण करून ‘घरात आली, तर अत्याचार करून बदनाम करू’ अशी धमकी देण्यात आली. तसेच, तिच्या आई-वडिलांनी लग्नात दिलेले सोन्याचे दागिने स्वतःच्या फायद्यासाठी बँकेत गहाण ठेवून फसवणूक तसेच विनयभंग, छळ करणाऱ्या दिरासह जावेविरोधात म्हसरुळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी महिलेच्या पतीचे निधन झाले असून, ती दि. १८ एप्रिल रोजी निसर्गनगर, म्हसरुळ येथे सासरी नांदायला गेली. यावेळी महिलेचा दीर आणि जाऊ यांनी पतीच्या निधनानंतर कागदोपत्री राहते घर हे फिर्यादीच्या नावावर असतानादेखील तिला मानसिक त्रास देऊन मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. ‘या घरी पुन्हा आलीस, तर तुझ्यावर अत्याचार करून बदनाम करून टाकीन’, अशी धमकी दिराने दिली. या प्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात दीर आणि जावेविरुद्ध छळवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
सोन्याचे दागिनेही घेतले:
विधवा महिलेला घर नावावर कर म्हणत त्रास देतानाच तिच्या आई-वडिलांनी लग्नात दिलेले सोन्याचे दागिने दीर आणि जाऊ यांनी स्वतःच्या फायद्यासाठी बळजबरीने घेतले. हे दागिने थत्तेनगर येथील एका बँकेत गहाण ठेवून फसवणूक केल्याचाही प्रकार समोर आला आहे.