नाशिक (प्रतिनिधी): वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होत असलेल्या मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात मंगळवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला. पण अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे मात्र नुकसान झाले.
नाशिकमध्येही ढगाळ वातावरण होते. या भागात गुरुवारी पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. दरम्यान, पुणे, पिंपरी-चिंचवड, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूरच्या काही भागात मंगळवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. सातारा जिल्ह्यातील कराडला विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस व गारांनी दोन तास झोडपून काढले. अहिल्यानगर शहर व जिल्ह्यातील काही भागातही तुरळक पाऊस झाला.
बुधवारी व गुरुवारीही हवामानातील बदल कायम राहणार असल्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत गारपिटीसह पाऊस होणार असल्याचे पुणे हवामान खात्याने सांगितले.
तीन बाजूंनी येणाऱ्या वाऱ्याचा संगम, कमी दाबाचा पट्टा यामुळे नाशिक शहरावर काळे ढग जमा झाले. मंगळवारी (दि. १) दिवसभर उष्ण व दमट वातावरण असल्याने उकाड्याने नाशिककर हैराण झाले आहेत. २ दिवसांत किमान तापमानात ५ अंश सेल्सिअसने वाढ होऊन मंगळवारी ते २४.२ तर कमाल ३३.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. काही ठिकाणी पावसाचे थेंबही पडले. पुढील २ दिवस हवामान ढगाळ राहण्याचा अंदाज वेधशाळेकडून वर्तविण्यात आला आहे.
![]()


