मंत्री गिरीश महाजन यांचं प्रतिपादन !

नाशिक (प्रतिनिधी): राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज (दि. २८ मार्च २०२५) त्र्यंबकेश्वर येथे भेट देऊन आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ चा आढावा घेतला. साधू- महतांच्या विविध मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री महाजन यांनी त्र्यंबकेश्वर येथे आज सकाळी विविध परिसराला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर नगरपरिषदेच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, अखिल भारतीय आखाडा परिषद अध्यक्ष महंत रवींद्रपुरी महाराज, जुना आखाडा महामंत्री हरिगिरीजी महाराज, बडा उदासीन आखाडा इंद्रमुनीजी महाराज, नवा उदासीन आखाड्याचे महंत गोपालदास महाराज, महानिर्वाणी आखाड्याचे अजय पुरी महाराज, आनंद आखाडाचे गणेशानंद सरस्वती व शंकरानंद सरस्वती, पुरोहित संघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
या बैठकीत कुंभमेळ्याला होणारी संभाव्य गर्दी आणि त्र्यंबकेश्वर शहर आणि विशेषत: कुशावर्त परिसरातील अरुंद जागा पाहता संभाव्य धोका टाळण्यासाठी त्र्यंबकेश्वर शहरालगत गोदावरी नदीवर नवीन घाट व त्या परिसरात इतर नवीन सुविधा तसेच नवीन कुंड उभारण्याची मागणी साधू, महंत आणि पुरोहित संघाने केली. या पार्श्वभूमीवर मंत्री महाजन यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या मागण्या मान्य केल्या आणि सांगितले की, कुंभमेळ्यासाठी राज्य शासनातर्फे विविध सोयीसुविधा पुरविल्या जातील. साधू, महंत आणि पुरोहित संघाच्या सहकार्याने येणारा कुंभमेळा यशस्वी करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तत्पूर्वी मंत्री गिरीश महाजन यांनी गोदावरी नदी, गोदावरील नदीवरील घाट, नील पर्वत, बिल्व तीर्थसह भगीरथ घाट, परशुराम घाट, गंगासागर तलाव, अहिल्या संगम घाट आदी विविध परिसराची पाहणी केली.
![]()


