नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून अँटीजन टेस्ट थांबवण्यास नगरसेवकांकडून विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे महापौर सतीश कुलकर्णी यांनी पुन्हा शहरात अँटीजन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर स्वॅब टेस्ट देखील महापालिका सुरू ठेवणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून अँटीजन चाचण्यांच्या किट्सची कमतरता झाल्याने चाचण्या कमी झाल्या होत्या. मात्र आता आणखी दहा हजार किट्सची उपलब्धता झाल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. म्हणून चाचणी घेण्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. कोरोनाबाधीतांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेच्यावतीने आरोग्य तपासणी मोहीम सुरू करण्यात आली होती आणि त्यामार्फत अँटीजन चाचण्या वाढवण्यात आल्या होत्या. या चाचण्यांमुळेच रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी त्यांना वेळीच शोधून त्यांच्यावर उपचार करण्यात येतोय म्हणून पुढील संसर्ग होण्यास आळा बसतो. जळगाव महापालिकेला दिलेले अडीच हजार किट्स उपलब्ध झाले होते. दरम्यान आता तूर्तास साडे बारा हजार किट्स उपलब्ध झाले आहेत.