Live Updates: Operation Sindoor

नाशिक: पत्नीशी अनैतिक संबंधांच्या संशयावरून एकाचा खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेप !

नाशिक (प्रतिनिधी): पत्नीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयावरून शेजारीच राहणाऱ्या व्यक्तीवर पतीने कोयत्याने तब्बल ४२ वार करून डाव्या हाताचा मनगटापासून पंजा तोडून क्रूरपणे हत्या केल्याच्या प्रकरणात संशयित पतीस न्यायालयाने जन्मठेपेची व २५ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

सदर घटना पाथर्डी गाव येथील दाढेगावरोडवर ६ डिसेंबर २०१९ रोजी घडली होती. विशेष म्हणजे, या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर झाल्याने न्यायालयाने या साक्षीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. पाथर्डीतील रहिवासी विठ्ठल मोहन गव्हाणे (४२) यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या घटनेत दाढेगाव रोडवरील रहिवासी नरपतसिंग गावित (४०) यांचा खून झाला होता.

👉 हे ही वाचा:  भारताने जैसलमेरमध्ये पाकिस्तानी फायटर जेट पाडले; एक पाकिस्तानी पायलट भारतीय सैन्याच्या ताब्यात !

इंदिरानगर पोलिसांत दाखल गुन्ह्यात संशयित आरोपी गव्हाणे याला त्याच्या पत्नीचे शेजारीच राहणाऱ्या नरपतसिंग याच्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यातून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. घराजवळच विठ्ठल व नरपतसिंग यांच्यात वाद होऊन विठ्ठलने हातातील कोयत्याने जवळपास ४२ वार करून त्यांचा खून केला होता. इंदिरानगर पोलिसांनी विठ्ठल विरोधात गुन्हा दाखल करीत अटक केली होती. तत्कालीन पोलिस निरीक्षक पी. टी. पाटील यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड पंकज चंद्रकोर यांनी युक्तीवाद केला. या खटल्यात १५ साक्षीदार तपासले. महत्वाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कृष्णा बरसतीलाल कनोजिया हा न्यायालयात साक्ष देताना फितूर झाला असताना अ‍ॅड. चंद्रकोर यांनी परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे गुन्हा सिद्ध केला.

👉 हे ही वाचा:  नाशिक: केटीएचएम कॉलेज येथे आज (दि. ७ मे) झालेल्या मॉक ड्रिलची क्षणचित्रे…

खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर झाल्याने त्याच्याविरोधात कारवाईची मागणी केली असता न्यायालयाने त्याच्याविरोधात फौजदारी संहितेनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. हा गुन्हा सिद्ध झाल्यास फितुर साक्षीदारास १ वर्ष सक्तमुजरी व दंडाची शिक्षा होऊ शकते. समाजात इतर गुन्ह्यातील साक्षीदार फितूर होऊ नये यासाठी न्यायालयाचा आदेश महत्वपूर्ण आहे. – पंकज चंद्रकोर, सरकारी वकील

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790