नाशिक (प्रतिनिधी): १६ वर्षीय मुलीशी मैत्री करून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करणाऱ्या विधीसंघर्षित बालकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की १६ वर्षीय फिर्यादी मुलगी व आरोपी विधीसंघर्षित बालक एकाच क्लासमध्ये शिकत होते. त्यातून त्यांची ओळख होऊन त्यांच्यात मैत्री झाली होती. नोव्हेंबर २०२४ मध्ये दिवाळीची सुटी असल्यामुळे पीडितेच्या शाळेला सुट्टया होत्या. त्यावेळी फिर्यादी मुलगी ही घरी एकटीच राहत असल्यामुळे विधीसंघर्षित बालक तिला घरी भेटण्यासाठी यायचा.
या बालकाने १६ वर्षीय मुलीशी गोड गोड बोलून तिची इच्छा नसताना तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दोन-तीन दिवसांनंतर विधीसंघर्षित बालक पुन्हा पीडितेच्या घरी आला व त्याने पुन्हा शरीरसंबंध केले. मुलीने या संबंधास विरोध केला होता; मात्र विधीसंघर्षित बालकाने संबंध केले. आई रागावेल म्हणून पीडित मुलीने ही गोष्ट आईला सांगितली नव्हती; मात्र विधीसंघर्षित बालकाकडून अधिकच त्रास होऊ लागल्याने तिने ही माहिती आईला दिली.
त्यानंतर पीडितेने अंबड पोलीस ठाण्यात विधीसंघर्षित बालकाविरुद्ध फिर्याद दिली असून, त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक फुलपगारे करीत आहेत.