नाशिक (प्रतिनिधी): यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा ३० वा दीक्षांत समारंभ येत्या २४ फेब्रुवारीला विद्यापीठ मुख्यालयात सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे. यात प्रत्यक्ष उपस्थित राहून संबंधित पदवी ग्रहण करू इच्छिणाऱ्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना १६ फेब्रुवारीपर्यंत आपल्या उपस्थितीची ऑनलाइन नोंदणी करावी लागणार असल्याचे विद्यापीठाने सांगितले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ मध्ये डिसेंबर २०२३, मार्च २०२४ व मे-जून २०२४ या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या पदवीधरांना या पदवीदान सोहळ्यात प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहेत. याप्रसंगी जे विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवी ग्रहण करण्यासाठी येणार असतील, त्यांना https://30convocation.ycmou.ac.in/attendance या लिंकवर जाऊन आपल्या उपस्थितीबाबतची माहिती ऑनलाइन पद्धतीने भरावी लागणार आहे.
नोंदणी केल्यानंतरच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवी ग्रहण करता येईल. नोंदणी केलेली नाही अशा विद्यार्थ्यांची पदविका, पदवी प्रमाणपत्रे दीक्षांत समारोहानंतर काही कालावधीत त्यांच्या अभ्यासकेंद्रामार्फत वितरित केली जाणार आहेत.