मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र कृषि-उद्योग विकास महामंडळाने विविध उत्पादनाला व शेतकऱ्यांच्या कृषी मालाला विक्रीसाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अधिक सक्षम करून त्याची माहिती शेतकऱ्यांना द्यावी. ड्रोनव्दारे औषध फवारणीसाठी प्रत्येक गावात ड्रोनची उपलब्धता करणे, शेतीमाल विक्रीसाठी निर्यात माल केंद्र उभारणे या नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यवाही करावी असे निर्देश कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले.
मंत्रालयात महाराष्ट्र कृषि-उद्योग विकास महामंडळाच्या कामकाजाच्या आढावा बैठकीत कृषी मंत्री ॲड माणिकराव कोकाटे बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, महाराष्ट्र कृषि-उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले, कृषी विभागाचे संचालक सुनिल बोरकर यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
कृषीमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, महाराष्ट्र कृषि-उद्योग विकास महामंडळाने शेतक-यांना रास्त भावात उपलब्ध होणारे उत्कृष्ट दर्जाचे पशुखाद्य निर्माण करावे. शेतकऱ्यांना परवडेल असा त्याचा दर असावा याची काळजी घ्यावी. खते, किटकनाशके शेतकऱ्यांना उपलब्ध करून देताना त्यांचा दर बाजारातील दरापेक्षा अधिक नसावा. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कृषि माल त्याचप्रमाणे महाराष्ट्र कृषि-उद्योग विकास महामंडळाच्या उत्पादित उत्पादनांसाठी ई कॉमर्स विभागाचे मार्केटींग करावे. ड्रोनव्दारे शेतीमध्ये औषध फवारणी करताना अत्यल्प, अल्प व जास्त जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ होईल असे पहावे. ड्रोन प्रत्येक गावात उपलब्ध होण्यासाठी विविध सामाजिक उत्तरदायित्व मध्ये सहभागी संस्था, राज्य शासन, केंद्र शासन यांच्याकडून निधी उपलब्धतेसाठी कार्यवाही करावी. रायगड जिल्ह्यात रसायनी (ता. पनवेल) येथे कृषी निर्यात क्षेत्र उभारणी साठीचा प्रस्ताव शासनाला सादर करावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या.