नाशिक (प्रतिनिधी): गुजरातमधील सापुतारा येथे नाशिक-गुजरात महामार्गावर एक खासगी बस २०० फूट खोल दरीत कोसळून भयानक अपघात झाला आहे. या दुर्दैवी घटनेत सात जणांचा मृत्यू झाला, तर १५ जण गंभीर जखमी झाले. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.
पहाटे पाच वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघात झालेल्या बसमध्ये ४८ प्रवासी प्रवास करत होते. ही बस रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेले बॅरिकेड्स तोडून खोल दरीत कोसळली, असेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
बसमधील ४८ भविकांना घेऊन बस नाशिकत्या त्र्यंबकेश्वरहून गुजरातमधील द्वारका येथे जात होती, यादरम्यान हा अपघात झाला. दरम्यान बसमधील भाविक हे मध्य प्रदेशमधील गुणा, शिवपुरी आणि अशोक नगर जिल्ह्यातील असल्याचे समजते.
अपघात इतका भीषण होता की बसचे अक्षरश: तुकडे झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.