नाशिक (प्रतिनिधी): शहरातून स्पोर्ट बाइक चोरी करत अहिल्यानगरमध्ये महाविद्यालयीन मैत्रिणींसोबत मौजमजा करणाऱ्या दोन सराईतांना अटक करण्यात आली आहे. संशयितांनी भद्रकाली परिसरातून २ आणि संगमनेरमधून ३ स्पोर्ट बाइक चोरी केल्या होत्या. पथकाने संशयितांकडून पाच दुचाकी जप्त केल्या. गणेश बाबासाहेब गायकवाड व अभिजित रामदास कांबळे अशी या दोघा संशयितांची नावे असून दोन १७ वर्षीय मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोदकेश्वर गणपती मंदिराजवळून स्पोर्ट बाइक चोरी झाली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना अशाच प्रकारची स्पोर्ट बाइक काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. विशिष्ट बाइक चोरी होत असल्याने पथकाने तंत्रविश्लेषण विभागाच्या मदतीने शोध सुरू केला. भद्रकाली परिसरातील सीसीटीव्ही तपासणी केली असता एक संशयित अहिल्यानगर येथे असल्याची माहिती मिळाली.
पथकाने अहिल्यानगर येथे तपास केला असता एक संशयित विनानंबरची स्पोर्ट बाइक वापर करत असल्याची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता संशयित गायकवाड, कांबळे या दोघांच्या मदतीने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. वरीष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील, सत्यवान पवार, कय्युम सय्यद, सतीश साळुंके, नीलेश विखे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
संशयित चौघे कॉलेजवयीन तरुण:
चौघे संशयित महाविद्यालयांचे तरुण असून चोरीच्या स्पोर्ट बाइक मैत्रिणींना फिरवण्याकरीता वापर करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. दोघांना तीन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
![]()


