नाशिक (प्रतिनिधी): केंद्रीय गृह,सहकार मंत्री अमित शहा हे शुक्रवार 24 जानेवारी रोजी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यानिमित्त ते नाशिक जिल्हा त्र्यंबकेश्वर व मालेगाव येथे भेट आहेत. त्यांची सुरक्षितता लक्षात घेता, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नाशिक जिल्ह्यात दिनांक 22 जानेवारी 2025 रोजीचे रात्री 00.00 ते दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी 00.00 या कालावधीत ड्रोन उड्डाणास प्रतिबंधित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी राजेंद्र वाघ यांनी दिले आहेत.
उपरोक्त कालावधीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने नो ड्रोन फ्लाय झोन घोषित करण्यात येत आहे. तसेच कोणत्याही प्रकारचे ड्रोन (मानवरहित साधन), पॅरा ग्लायडर्स, पॅरा मोटर्स, हॉटएअर बलून्स, मायक्रोलाईटस् एअरक्राफ्ट आदी तत्सम हवाई साधनांमार्फत सक्षम प्राधिकारी यांची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय ड्रोनचे उड्डाण/ वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील (ग्रामीण) ड्रोन चालक व मालकांनी सदर परिसरात 22 ते 24 जानेवारी 2025 या कालावधीत ड्रोनचे उड्डाण करू नये. तसेच नाशिक जिल्ह्यात ड्रोनद्वारे करण्यात येणाऱ्या छायाचित्रीकरणाच्या परवानगी बाबतचे संपूर्ण अधिकार प्रशासनाने राखून ठेवले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरूद्ध भारतीय दंड विधान कलम, इंडियन एअर क्राफ्ट कायदा आणि इतर प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.
![]()


