नाशिक (प्रतिनिधी): दारूच्या नशेत बाप आणि मुलामध्ये झालेल्या भांडणात बापाने मुलाच्या डोक्यात फळी मारल्याने मुलगा जागीच ठार झाला. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात बुधवारी दुपारपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार दिवसांत हा दुसरा खून झाला असून याप्रकरणी संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास विठ्ठल गुंजाळ आणि मुलगा अनिल गुंजाळ (२०, रा. आम्रपाली झोपडपट्टी, उपनगर कॅनॉल रोड) या दोघांनी दारू प्राशन केली होती. यानंतर दोघांमध्ये भांडण झाले. यात विठ्ठलने अनिलच्या डोक्यात फळी मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या बाप-लेकांमध्ये दररोज नशेमध्ये भांडण होत असे. तसेच गेल्या महिनाभरात त्यांच्यात १२ वेळा हाणामारी झाली होती. मंगळवारी रात्री दोघेही नशेत असताना त्यांच्यात वादझाले होते.
हल्लेखोर बाप विठ्ठल गुंजाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मृत अनिलला आई नसल्याने दोघेच बाप-लेक सोबत रहात होते. त्यांच्याविरोधात चोरीच्या तक्रारी दाखल असल्याचे निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी सांगितले.