नाशिक (प्रतिनिधी): ओरिसा दरम्यान असलेल्या प्रत्यावर्ती म्हणजे घड्याळ काट्याच्या दिशेप्रमाणे वाहणाऱ्या चक्रीय वाऱ्यामुळे तसेच बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्राकडे आर्द्रता आणणाऱ्या वाऱ्यामुळे आगामी तीन दिवस दिवसा गारवा तर रात्री उबदारपणा जाणवणार आहे.
तसेच आज गुरुवारी विदर्भात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी अगदी हलक्या पावसाचा अंदाज आहे. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, सातारा, पुणे, संभाजीनगर, नांदेड, जालना, परभणी, बीड, लातूर या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी मात्र किमान तापमानातील वाढलेले राहणार असल्याने १८ जानेवारीपर्यंत थंडीची तीव्रता जाणवेल. मात्र दिवसा वातावरणात गारवा रहाणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला.
१९ ते २१ पुन्हा थंडी:
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पालघर या जिल्ह्यात सकाळची आर्द्रता ही ७० ते ८० टक्के आहे, त्यामुळे वातावरण अति ढगाळ नसले तरी निरभ्रते ऐवजी आकाश अंशतः ढगाळ दिसत आहे. १९ ते २१ जानेवारी दरम्यान पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रात थंडी जाणवणार आहे.