आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृहाच्या स्वतःच्या इमारती बांधण्याचे नियोजन करावे- डॉ. उईके

नाशिक (प्रतिनिधी): आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृहाच्या स्वत:च्या, हक्काच्या पक्क्या इमारती बांधण्याचे नियोजन करीत १०० दिवसांच्या कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आज येथे दिले.

मंत्री डॉ. उईके यांच्या उपस्थितीत आज सकाळी आदिवासी विकास विभागाची क्षेत्रीय कार्यालय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ,  खासदार भास्करराव भगरे, खासदार राजाभाऊ वाजे,

आमदार किरण लहामटे, आमदार राजेश पाडवी, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आदिवासी आयुक्त नयना गुंडे, व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड आदी उपस्थित होते.

⚡ हे ही वाचा:  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी पूर्ततेबाबत महत्वाची बातमी

यावेळी मान्यवरांच्या हस्ते आदिवासी विकास महामंडळाने तयार केलेली डायरी, दिनदर्शिका, ग्रीटिंग कार्डचे अनावरण मंत्री डॉ. उईके यांच्या हस्ते करण्यात आले.

मंत्री डॉ. उईके म्हणाले की, आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याची आवश्यकता आहे. आदिवासी विभागातील रस्ते बांधत प्रत्येक गाव – पाडा मुख्य रस्त्याशी जोडले येईल, असे नियोजन करावे. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यासाठी पाण्याची कायम स्वरुपी व्यवस्था करावी. हिवाळ्यात गरम पाणी उपलब्ध होईल याची दक्षता घ्यावी. सौर ऊर्जा प्रकल्प नादुरुस्त असतील, तर ते तातडीने दुरुस्त करून घ्यावेत. विभागातील अधिकाऱ्यांनी एक आश्रमशाळा आणि वसतिगृह दत्तक घेत त्याचे पालकत्व स्वीकारावे. राज्यातील दुर्गम भागातील सर्व आश्रमशाळा, वसतिगृह यांना भेट देण्याचा संकल्प करावा. तेथे मुक्काम करून सोयीसुविधांची पाहणी करावी. त्यात मंत्री महोदयापासून ते अधिकारी यांनी सहभागी व्हावे. विभागाच्या माध्यमातून विविध लाभ दिले जातात. त्याविषयी समाज माध्यमातून माहिती द्यावी, असेही त्यांनी आवाहन केले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: निसर्गवेधी पक्षीमित्र आनंद बोरा यांना एनसीएफचा ‘आऊटस्टडींग सिटीझन’ पुरस्कार !

मंत्री झिरवाळ म्हणाले की, आदिवासी विकास विभागाचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. या विभागाचे कार्य क्षेत्र मोठे आहे. प्रकल्प अधिकारी यांनी आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सांघिक प्रयत्न व्हावेत, असेही त्यांनी सांगितले.

विभागाचे सचिव वाघमारे यांनी सांगितले की, विभागाच्या माध्यमातून कालबध्द कार्यक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. १०० दिवसांच्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यावर भर द्यावा.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: शहर पोलिसांचा १०२ टवाळखोरांना कायदेशीर दणका !

यावेळी राज्यातील प्रकल्प अधिकारी यांनी आपल्या विभागातील कामकाजाची माहिती दिली. आयुक्त श्रीमती गुंडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आदिवासी विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी, प्रकल्प अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790