नाशिक: शुभमंगल सामूहिक विवाह योजना; इच्छुकांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

नाशिक (प्रतिनिधी): महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नाशिक कार्यालयामार्फत ‘शुभमंगल सामूहिक/ नोंदणीकृत विवाह योजना’ जिल्ह्यातील खुला प्रवर्ग व इतर मागासवर्ग प्रवर्गातील रूपये एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या निराधार, विधवा, परित्यक्ता महिलांच्या केवळ दोन मुलींच्या विवाहासाठी राबविण्यात येते.

ज्या नोंदणीकृत संस्था शुभमंगल सामूहिक योजना राबविण्यासाठी उत्सुक असतील तसेच नोंदणीकृत विवाह करणाऱ्या खुला प्रवर्ग व इतर मागासवर्ग प्रवर्गातील दाम्पत्यांनी विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करून घेवून त्वरीत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाने यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: युवकाच्या खूनप्रकरणी महिलेसह चौघांना जन्मठेप !

‘शुभमंगल सामूहिक/ नोंदणीकृत विवाह योजना’ जिल्ह्यातील नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांमार्फत राबविण्यात येत असून विवाह करणाऱ्या जोडप्यास रूपये 25 हजार व सामूहिक विवाहाचे आयोजन करणाऱ्या संस्थेस एका जोडप्यामागे रूपये 2 हजार 500 इतके अनुदान देण्यात येते. योजना राबवितांना किमान 5 व कमाल 100 जोडप्यांचा समावेश करण्याची परवानगी आहे. संस्थेस वर्षातून दोनदाच सामूहिक विवाह समारंभ आयोजित करता येईल.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकच्या सायकलपटूंनी रॅलीतून दिला 'माझा भारत - माझं मत'चा संदेश

स्वयंसेवी संस्थेने पात्र लाभार्थ्यांचे आवश्यक कागदपत्रे एकत्रित करून विवाह सोहळ्याच्या एक महिना अगोदर सादर करणे आवश्यक आहे. तसेच विवाह सोहळ्यात भाग घेतलेल्या जोडप्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग व विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. ज्या जोडप्यांना केवळ नोंदणीकृत विवाह करावयाचा आहे त्यांना सामूहिक विवाह सोहळ्यात सामील होणे बंधनकारक नाही.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चोरीच्या पाच मोटारसायकलींसह आरोपी अटकेत; पाच गुन्हे उघडकीस

शुभमंगल सामूहिक/ नोंदणीकृत विवाह योजनेचे अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नाशिक-पुणे रोड, नाशिक क्लब समोर, नासर्डी पुलाजवळ, नाशिक 422011 येथून प्राप्त करून या कार्यालयातच प्रस्ताव सादर करावेत, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790