नाशिक (प्रतिनिधी): वृद्ध बहीण-भाऊ सराफी दुकानात सेल्समनला बोलण्यात गुंतवून ठेवत बहीण पर्समध्ये दागिने टाकून घेत असे. त्यानंतर दोघेही फरार होत असे. नाशिकमध्ये मात्र त्यांचा हा खेळ फसला आणि त्यांना उपनगर पोलिसांनी भक्तिधाम, पंचवटी येथे ताब्यात घेतले. तीन गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली आहे.
अहमदाबादचे चंद्रकांत परमार (५५) व पूनम कमलेश शर्मा (५७) हे बहीण-भाऊ दोन दिवसांपूर्वी नाशिक-पुणेरोडवरील एका बड्या सराफी दुकानात खरेदीसाठी गेले होते. कपडे आणि राहणीमान अतिशय उच्च असल्याने त्यांच्यावर कोणालाही संशय आला नाही.
आमच्या मुलीचे लग्न आहे, बांगड्या घ्यायच्या आहेत असे त्यांनी सांगितले. यातील भावाने सेल्समनला बोलण्यात गुंतवून ठेवले तर बहिणीने तेव्हाच सोन्याच्या दोन बांगड्या आपल्या पर्समध्ये टाकून घेतल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून त्याचा माग काढला भक्तिधामजवळून गुजरातकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसने ते पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून ५ लाख ३० हजार रुपयांचे दागिने जप्त केले आहेत. त्यांनी शुक्रवारी उपनगर पोलिस ठाणे, नाशिक, बाजार पोलिस ठाणे सोलापूर, सहकारनगर पोलिस ठाणे, पुणे या हद्दीत चोरी केल्याची कबुली दिली. वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांच्या पथकाने ही कारवाई केली. (उपनगर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ०१/२०२५)
![]()


