नाशिक: पोलिसांच्या सतर्कतेने महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला !

👉 दीपक श्रीवास्तव, नाशिक कॉलिंग प्रतिनिधी, निफाड
लासलगाव बस स्थानकाजवळ मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाराष्ट्र बँक व भगरी बाबा मंदिर नजीकचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न लासलगाव पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अयशस्वी झाला. पाऊण तास पाठलाग केल्यांनातर विदेशी गाडीच्या तब्बल १४० प्रतितास वेगामुळे आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले असले तरी चार एटीएम मधील लाखो रुपये वाचविण्यात पोलीस यशस्वी झाल्याने नागरिकांनी लासलगाव पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

रविवार दि.२९ रोजी रात्री २.२१ वाजेच्या सुमारास काही इसम तोंड बांधून लासलगाव बस आगारा नजीकच्या महाराष्ट्र बँकेच्या एटीएम मध्ये घुसले. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारल्याने सुरक्षा अलार्म वाजला. याबाबत बँकेकडून लासलगाव पोलिसांना फोन आला. रात्रीच्या वेळी उपस्थित असलेले कर्मचारी विंचुर येथे गस्त घालत असल्याने ठाणे अंमलदार किशोर लासुरकर व पोलीस शिपाई अमोल तळेकर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जीव धोक्यात घालून अवघ्या काही मिनिटात मोटार सायकल वरून एटीएम कडे धाव घेतली.

👉 हे ही वाचा:  नाशिक: जीएसटी गुप्तचर यंत्रणेची मोठी कारवाई; सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या घरावर छापा !

आरोपी पोलिसांना पाहून एम.एच.०१ बी.डी.८७८४ क्रमांकाच्या स्कोडा कारमधून विंचुरच्या दिशेने पळाले. पो.हवा.लासुरकर यांनी तातडीने सहायक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे व विंचुरच्या कर्मचाऱ्यांना यबाबत अवगत केल्याने शिंदे व पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब हांडाळ तातडीने पोलीस गाडीसह हजर झाले.

पोलीस उपनिरीक्षक हांडाळ, पोलीस हवालदार बाबासाहेब कांदळकर, पोलीस हवालदार लासुरकर, पोलीस शिपाई तळेकर, चालक मांजरे यांनी विंचुरच्या दिशेने आरोपींचा पाठलाग सुरु केला. तेव्हा आरोपी भगरी बाबा मंदीरासमोरच्या येस व एच.डी.एफ.सी बँकेचे एटीम फोडण्याच्या प्रयत्न करतांना आढळून आले. पोलीस गाडीच्या खाली उतरत असतानाच आरोपींनी गाडीत बसून पळ काढत असतांना लासुरकर यांनी गाडीवर जोरदार काठी मारली.

👉 हे ही वाचा:  त्र्यंबकेश्वरसाठी २५ जादा बसेस; श्रावणी सोमवारचे नियोजन

सदर गाडीचा पाठलाग सुरु असतांना विंचुर गावात पोलिसांनी गाडी आडवी घालण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी चक्क दोन चाके दुभाजकावर घालून गाडी येवल्याच्या दिशेने पळवली. याबाबत पोलिसांनी नाशिक कंट्रोलरूम, येवला तालुका, येवला शहर पोलीस ठाणे तसेच जिल्ह्यात नाकाबंदी लावण्यास कळविले. पोलीस येवला दिशेने गाडीचा पाठलाग करत असताना गाडीने अचानक यु टर्न घेऊन निफाडकडे तब्बल १३० ते १४० प्रति तास वेगाने पळून जाण्यात यशस्वी झाले.

त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी उपविभागीय अधिकारी निफाड तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना तात्काळ फोनद्वारे माहिती दिली व हॉटेल, धाबे, पेट्रोलपंप चेक करणेबाबत सूचना देऊन फिंगरप्रींट युनिट पाठविणे बाबत कंट्रोलला कळविले. विदेशी गाडीचा प्रचंड वेग व पोलीस गाडीच्या कमी वेगामुळे पोलीस आरोपींना पकडण्यात अयशस्वी झाले असले तरी ठाणे अंमलदार किशोर लासुरकर व तळेकर यांनी जीव धोक्यात घालून दाखवलेले प्रसंगावधान, पोलीस उपनिरीक्षक हंडाळ व कर्मचारी यांनी केलेला पाठलाग यामुळे आरोपींची पळताभुई थोडी झाली व चार एटीएम मधील लाखो रुपये वाचविण्यात पोलिसांना आलेले यश यामुळे लासलगाव पोलिसांचे परिसरातून अभिनंदन होत आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: शहरात जूनमध्ये ३६४ तर जुलैमध्ये २२१ मिमी पावसाची नोंद

लासलगाव पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी क्षेत्रातील बँकांना कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमण्यात यावा यासाठी वारंवार अधिकाऱ्यांसमवेत बैठका घेतल्या आहेत. पत्रव्यवहार केला आहे. मात्र ही आमची जबाबदारी नसल्याचे बँकांकडून सांगण्यात येते. याबाबत या बँका निष्क्रिय आहेत. त्यामुळे वारंवार अशा घटना घडत आहेत. याबाबत सहकारी, खाजगी बँका सजग आहेत. त्यामुळे खाजगी बँकामध्ये अशा घटनांना वाव नाही.- भास्करराव शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक, लासलगाव

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790